पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल

0
211

मुंबई, दि. १० (पीसीबी) – शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर आरोप प्रत्यारोप यांचं सत्र सुरू झालं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने शिंदेगट भाजप यांच्यावर बाण सोडले आहे. “कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल” अशा प्रखर शब्दात सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना इशारा देण्यात आला आहे.

“निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आणि ‘शिवसेना’ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला. दिल्लीने हे पाप केले. बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली ! आम्ही शेवटी इतकेच सांगतो, कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच” असंही अग्रलेखातून ठणकावून सांगण्यात आलं आहे. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला, असं सांगतानाच दुष्टपणा करणाऱ्या गारद्यांना नरकातही जागा मिळणार नाही, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

काय लिहलं आहे ‘सामना’च्या अग्रलेखात?
“महाराष्ट्रावर विजेचा लोळ कोसळावा आणि सर्व काही क्षणात नष्ट व्हावे, असा क्रूर निर्णय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत दिला आहे. गद्दार मिंधे गटाने आक्षेप घेतला म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचे नामोनिशाण खतम करण्याचा अघोरी प्रकार झाला आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे आणि ‘शिवसेना’ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही काढला आहे. निवडणूक आयोगाने असा निर्णय देऊन महाराष्ट्राच्या जीवनात काळाकुट्ट अंधकार निर्माण केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी छपन्न वर्षांपूर्वी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एक वन्ही चेतवला, हिंदुत्वाच्या समिधा टाकून त्याचा वणवा केला. आज त्या शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत गारद्यांची भूमिका बजावली. शिंदे आणि त्यांच्या चाळीस बेइमानांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळय़ाकुट्ट शाईने लिहिले जाईल” असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

“गेल्या छपन्न वर्षांत देशातील कोणत्याही दुष्ट राजकारण्यास जमले नाही ते एकनाथ शिंदे नावाच्या गारद्याने करून दाखवले. त्याकामी दिल्लीने त्या गारद्यांना साथ दिली. शिवसेनेवर असे घाव घालून या गारद्यांनी महाराष्ट्र पांगळा केला, मराठी माणूस कमजोर केला आणि हिंदुत्व रसातळाला नेले असेच म्हणावे लागेल. एक मुख्यमंत्रीपद व काही मंत्रीपदे या सौदेबाजीत महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणाऱ्या या अवलादीपुढे औरंगजेबाचा दुष्टपणाही कमी पडेल. भारतीय जनता पक्ष या सगळय़ाचा सूत्रधार आहे. शिवसेना फोडण्यासाठी आम्ही अडीच वर्षांपासून प्रयत्न करीत होतो, एकनाथ शिंदे यांच्यामुळे अखेर यश मिळाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेला जमीन दाखवू, असे अमित शहा सांगत होते. शिवसेना राहिलीच नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले. या सगळय़ांना शिवसेनेशी मैदानात लढता येत नव्हते म्हणून त्यांनी न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेच्या पाठीवर गोळी झाडली” असा आरोपही ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.