पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करा अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ यांनी केली आहे. चेतन भुजबळ यांनी आज (दि.२६) आमदार अश्विनी जगताप यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. यावर सदर प्रस्ताव तात्काळ तपासून सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सचिवांना दिले आहेत.
चेतन भुजबळ यांनी आज विधानभवन, मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या सर्वांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप ह्या उपस्थित होत्या. याप्रसंगी पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या पुनावळे येथे महाराष्ट्र शासन वनविभागाची २६ हेक्टर जागा आहे. या जागेवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने मागणी केल्यामुळे सदर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर महापालिकेने २००८ साली कचरा डेपोसाठी आरक्षण टाकले आहे.
२००८ साली पुनावळे येथे नागरीकरण झाले नव्हते. मात्र गेल्या पंधरा वर्षांत या भागात विविध शैक्षणिक संस्था, मोठे गृह प्रकल्प, शेजारी हिंजवडी आयटी पार्क असल्याने पुनावळे येथे देशभरातील अनेक नागरिक येथे नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. सध्या पुनावळे या उपनगराची लोकसंख्या जवळपास एक लाखाच्या आसपास झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत पुनावळे येथे कचरा डेपो झाल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. तसेच पुनावळे येथील बांधऱ्यामधून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. या कचरा डेपोमुळे शहरातील सर्व नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या वनविभागाच्या २६ हेक्टर जागेवरती अनेक प्रकारची दाट वृक्षे आहेत. सदर कचरा डेपो येथे निर्माण केल्यास या जागेवरील संपूर्ण वृक्ष तोड करावी लागेल. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. तरी या सर्व बाबी विचारात घेवून पुनावळे येथे प्रस्तावित असणारा कचरा डेपो रद्द करण्यात यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. सर्व नागरिक आणि ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून सदर प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी चेतन भुजबळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावर सदर प्रस्ताव तात्काळ तपासून सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सचिवांना दिले आहेत. आता राज्य सरकार पुनावळे येथील या प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.