पुनावळे-ताथवडे अंडरपास अवजड वाहनांसाठी बंद

0
278

पिंपरी, दि. २७ (पीसीबी): पुनावळे-ताथवडे अंडरपास अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण यामुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे.

पुनावळे-ताथवडे अंडरपास अवजड वाहनांसाठी बंद करण्याबाबत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी आदेश दिले आहेत. पुनावळे-ताथवडे अंडरपासच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या रहिवासी इमारती निर्माण झाल्या आहेत. अनेक दुकाने, आस्थापना, शोरूम देखील या भागात आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांचा मोठा राबता असतो.

पुनावळे, ताथवडे, जांबे, नेरे, पांढरे वस्ती, हिंजवडी येथे जाण्यासाठी पुनावळे-ताथवडे अंडरपासचा वापर केला जातो. बेंगलोर-मुंबई महामार्गावर असलेल्या या अंडरपासमध्ये कायम गर्दी असते. याच मार्गावरून डंपर, मिक्सर आणि इतर अवजड वाहने जात असतात. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते.

ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुनावळे-ताथवडे अंडरपासमधून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ही वाहने रावेत येथील मोठ्या अंडरआपस मधून इच्छित स्थळी जातील, असे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.