पुनावळेतील कचरा डेपोसाठी आत्तापर्यंत मोजलेत साडेतीन कोटी; जागेचा प्रश्‍न “जैसे थे”!

0
483

पिंपरी दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरिकरणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा डेपोसाठी 2008 मध्ये पुनावळेतील 26 हेक्‍टर जागा मंजुर आहे. असे असतानाही गेल्या 15 वर्षांपासून या जागेचे भिजत घोंगडे कायम आहे. या जागेसाठी महापालिकेने तब्बल 3 कोटी 57 लाख रूपये आत्तापर्यंत मोजले आहेत. मात्र, कचरा डेपोचा प्रश्‍न “जैसे थे” आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 1100 टन कचरा निर्माण होतो. हा सर्व कचरा सध्या मोशी येथील कचरा डेपोत डम्पिंग केला जातो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून खतनिमिर्ती केली जाते. प्लॅस्टिकच्या कचऱ्यातून इंधन निर्मिती केली जाते. मोशी येथील कचरा डेपोची निर्मिती 1991 साली झाली आहे. हा परिसर जवळपास 81 एकरचा आहे. आता मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे. त्यामुळे पुनावळे येथे कचरा डेपो करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

पुनावळेत वन विभागाची 26 हेक्‍टर जागा महापालिका घेणार असून त्याबदल्यात मुळशीतील पिंपरी येथे वन विभागाला महापालिका पर्यायी जागा देणार होती. मात्र, या ठिकाणी मुरूम असल्याने वन विभागाने या जागेचा पर्याय नाकारला आहे. पुनावळेतील जागेवर वृक्ष आहेत, याठिकाणी कचरा डेपो झाल्यास येथील झाडे तोडावी लागतील. त्यामुळे वन विभागाला जाडे लावण्यासाठी जागा देणे बंधनकारक आहे. तसेच महापालिकेने आत्तापर्यंत वनीकरणासाठी 3 कोटी 57 लाख 13 हजार 730 रूपये वेळोवेळी अदा केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडे लॅड बॅंक असते. या लॅड बॅंकेतून वनविभागाला जागा देण्यात येईल. मात्र, जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासन आणि वन विभाग यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतरच जागेचा दुसऱ्या पर्यायावर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. तसेच महापालिकेने 2013 मध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पुनावळेतील जागा ताब्यात देण्याबाबत पत्र दिल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पुनावळे भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने नागरिकरण वाढत आहे. तथापि, पुनावळे ग्रामस्थ आणि बांधकाम व्यावसायिकांचा पुनावळेत कचरा डेपोला विरोध आहे. त्यामुळे महापालिका कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यासाठी खरेच प्रयत्न करणार का? आणि कचरा डेपो सुरू होणार का? हा खरा महत्वाचा प्रश्‍न आहे.