पुतण्याचं काका विरोधात बंड, निहार ठाकरे शिंदेगटासोबत ?

0
263

मुंबई,दि. 30 (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत थोरले चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेटली. निहार ठाकरे यांनी शिंदेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सख्खा पुतणा निहार ठाकरे शिंदेंना जावून मिळाला. त्यामुळे शिवसेना घरातूनच फुटली, अशा चर्चांना उधाण आलं. निहार यांनी शिंदेंच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण शिंदेंना का भेटलो? याबाबत माहिती दिली. निहार यांनी एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईत पूर्णपणे मदतीचं आश्वासन दिलं आहे. निहार हे पेशाने वकील आहेत. त्यांचं स्वत:चं लॉ फर्म आहे. त्यामुळे कोर्ट-कायदेशीर लढाईत शिंदेंना त्यांची खरंच मदत होवू शकते. निहार यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधातील गटाला पाठिंबा दिल्याने मुख्य शिवसेनेला मोठा झटका मानला जातोय. दरम्यान, निहार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष टीका करणं टाळलं आहे. 

“मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही चर्चा केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे नक्कीच पुढे घेवून जातील. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे. माझी स्वत:ची लॉ फर्म आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जी काही लीगल मदत लागेल ती मी देईन”, असं निहार ठाकरे यांनी सांगितलं.
यावेळी निहार ठाकरे यांना उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पुढे घेवून जात नाहीयत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “काय चाललंय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे”, असं विधान केलं. “शिंदे आपलेच नेते आहेत. मी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटायला गेलो असं काही नाहीय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शाखाप्रमुख पासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत काम करत केलं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. मी राजकारणात सक्रिय झालेलो नाही. पण शिंदेंना जी लीगल मदत लागेल त्यासाठी मी मदत करेन”, असं निहार म्हणाले.