पुणे: पिंपरी चिंचवडची वाटचाल बीडच्या दिशेने तर चालली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिसाने अनेक नियम खुंटीवर टांगत बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलंय आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे या बर्थडे सेलिब्रेशनचं गुन्हेगारांनी आयोजन केलं होतं, अशी खात्रीपूर्वक सूत्रांनी माहिती दिली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातल्याने, अख्ख्या पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली. पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा सांगवी पोलीस स्टेशनच्या दारात रात्री बाराच्या ठोक्याला बर्थडे सेलिब्रेशन झालं. त्यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते, त्यांनीच प्रवीणच्या बर्थडे सेलिब्रेशनचं जंगी आयोजन केलं होतं. चार पैकी दोघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आणि दोघांवर हाणामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस खात्याकडूनचं प्राप्त झाली आहे. सांगवी पोलीस स्टेशन समोर या गुन्हेगारांनी आयोजित केलेल्या बर्थडे सेलिब्रेशनवेळी प्रवीण आणि सहकाऱ्यांनी कोणकोणते नियम खुंटीवर टांगल्याच्या चर्चा आहेत.
रात्री 12च्या ठोक्याला भररस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन
पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करण्याची, रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांचे बार लावण्याची अन सेलिब्रेशनच्या नावाखाली धांगडधिंगा घालण्याची जणू प्रथाचं आहे. बरं हा सगळा धिंगाणा बहुतांश वेळी पोलिसांनी नजरेस पडत नाही. आता हे बर्थडे सेलिब्रेशन धन दांडग्यांचे असल्यानं पोलीस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात अन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत ही खबर पोहचू न देण्यासाठी ही खटाटोप सुरु असतो, हे उघड आहे. पण आता तर एका पोलीस शिपायाने हा सगळा राडा केलाय, तो पण थेट पोलीस स्टेशनच्या दारातचं. अगदी एखाद्या रीलस्टारला लाजवेल असं ड्रोनद्वारे या बर्थडे सेलिब्रेशनचं चित्रीकरण ही केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई प्रवीण पाटील ने हा प्रताप केला आहे, ज्यामुळं अख्ख्या पोलीस खात्याची मान शरमेने खाली गेली. आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या प्रकरणी काही कठोर कारवाई करतात का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलं आहे.
बुधवारचा दिवस संपताच गुरुवारची सुरुवात होताना, प्रवीण पाटीलची मित्रमंडळी सांगवी पोलीस स्टेशन समोर जमू लागली. अशात पोलीस स्टेशनमधील इतर सहकारी ही सहभागी झाले. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली होती. बारा वाजताच प्रवीणसह मित्र मंडळी पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालं. दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली, दुसरीकडे स्काय शॉट आणि आयटम बॉम्ब फुटू लागले. ही आतषबाजी बराचवेळी सुरु होती. जमाना रिल्सचा आहे म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही, असं कसं होईल. हे सगळं ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आलं, भलेभले रीलस्टार सुद्धा लाजतील इतकं अफलातून एडिटिंग ही करण्यात आलं. मग काय दिवस उजाडताच हे व्हिडीओ प्रवीण आणि सहकाऱ्यांसह मित्र मंडळींच्या स्टेट्सवर हे व्हिडीओ अपलोड होऊ लागले.
पिंपरी चिंचवड शहरात रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालून बर्थडे सेलिब्रेशन करण्याचं फॅड आहेच. पोलीस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना, इतर पोलिसांचे कान अन डोळे बंद होते का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. बरं या महाशयांनी हा व्हिडीओ स्टेट्सला ठेवला. त्यामुळं पोलीस वर्दीचा कसा गैरफायदा घेऊ शकतात, हे समाजासमोर आलं. आता नेहमीप्रमाणे ही बाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत कोणी पोहचू दिलीच नाही. पण एबीपी माझाच्या हाती हा व्हिडीओ लागला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. हा व्हिडिओ पाहून वरिष्ठांना ही धक्का बसला पण या व्हिडीओमुळं अख्ख्या पोलीस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. त्यामुळं पोलीस खात्याची मान शरमेने खाली गेलीये. आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या पोलीस महाशयांवर काय कठोर कारवाई करतात का? अन यानिमित्ताने रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालत, साजरे होणारे बर्थडे सेलिब्रेशनची प्रथा कायमस्वरूपी बंद पाडणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
नेमकं काय घडलं?
# गुन्हेगारांनी आयोजित केलेल्या बर्थडे सेलिब्रेशनला पोलिसांची हजेरी
# थेट पोलीस स्टेशन समोरील मार्ग अडवणे अन् मार्गाच्या मधोमध केक कापला
# रात्री दहा नंतर फटाक्यांची आतषबाजी केली
# विनापरवाना ड्रोन उडविला
# सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करत समाजाला प्रवृत्त करणं
# पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित प्रत्येकाने याकडे कानाडोळा करणे