पुण्यात सायबर चोरट्यांकडून पाच जणांना ४७ लाखांचा गंडा

0
17

पुणे दि.02 (पीसीबी) : पुण्यात सायबर चोरट्यांनी पाच जणांना ४७ लाख २७ हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर ट्रेडींगच्या बहाण्याने भैरवनगर धानोरीमधील २५ वर्षीय तरुणाला १२ लाख ५८ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली आहे.

बकोरी रोड वाघोलीतील एका व्यक्तीला टास्क फ्रॉडद्वारे सायबर चोरट्यांनी १० लाख ४९ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला पार्टटाइम नोकरीचे प्रलोभन दाखवून आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवून फिर्यादीकडून वेळोवेळी १० लाख ४९ हजार रुपये आपल्या खात्यावर घेतले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

अशाच प्रकारे हडपसरमधील ३३ वर्षीय तरुणीची फसवणूक केली आहे. तिला देखील व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करून टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने तिच्याकडून पैसे उकळले. आर्थिक प्रलोभनाला बळी पडून तरुणीने सहा लाख ४५ हजार रुपये सायबर ठगांच्या हवाली केले. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टास्क आणि शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी सय्यदनगरमधील तरुणीची सात लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी, काळेपडळ पोलिसांनी ३६ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनी लॉन्ड्रींगचे पैसे तुमच्या बँक खात्यावर आल्याचे सांगून मुंबईतील सायबर सेलमधून बोलत असल्याची बतावणी करत मोहम्मदवाडीतील ७३ वर्षीय ज्येष्ठाला सायबर चोरट्यांनी १० लाख २७ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी ज्येष्ठाने दिलेल्या फिर्यादीनुसार काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सायबर चोरट्यांनी मुंबई सायबर सेलमधून बोलत असल्याची बतावणी करत फिर्यादीसोबत संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादींच्या बँक खात्यावर मनीलॉन्ड्रींगमधील पैसे आल्याचे सांगून धमकावले. स्काईलवर चौकशी करण्याचे सांगून फिर्यादींच्या बँक खात्यावरील पैसे आपल्या खात्यावर वळवून घेतले. मात्र, जेव्हा फिर्यादींना असे काही घडले नसल्याचे समजले तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.