दि.१०(पीसीबी)-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यभर दौरे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे महानगरपालिका निवडणूक मोहिमेची धुरा आता खासदार सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली आहे. त्यांनी आज जिजाऊ बंगला निवासस्थानी पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या.
पक्षाच्या संघटनात्मक तयारीपासून ते प्रभाग निहाय प्रचारातील बारकाव्यांवर चर्चा करताना सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक उमेदवाराशी स्वतंत्र साधला. मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर, स्थानिक प्रश्नांवर संवेदनशीलपणे भाष्य करण्यावर आणि विकासकामांचे भक्कम उदाहरण जनतेसमोर ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांनी गेल्या काही दशकांत केलेल्या विकासकामांचा ठोस उल्लेख उमेदवारांनी आपल्या प्रचारातून करावा, असे स्पष्ट मार्गदर्शन त्यांनी दिले. संघटना तळागाळात अधिक मजबूत करण्याची आणि सर्व स्तरांवर समन्वय राखण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत प्रत्येक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील निवडणूक परिस्थिती, बूथवार कार्यकर्त्यांची तयारी तसेच प्रचार योजनांचा आढावा दिला. सर्व उमेदवारांनी सामूहिकपणे एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय हा प्रत्येक कार्यकर्त्याचा संकल्प असल्याचे सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळत असलेले मार्गदर्शन आणि पाठबळ यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक मोहीम आता आणखी वेग घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









































