पुणे, दि. २५ (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर अनेक जिल्ह्यातून महाविकासाघाडीचा सुपडासाफ झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यात महाविकासाआघाडीचा मोठा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत झाली. तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असे चित्र पाहायला मिळाले. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे.
पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. पुण्यातील तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. पुणे जिल्ह्यात महायुती सुसाट सुटली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात रविंद्र धंगेकर, पुरंदर विधानसभेत संजय जगताप आणि भोर विधानसभा मतदारसंघामध्ये संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आहे. भोर तालुक्यात थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला अजित पवारांनी सुरुंग लावला आहे.
पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे. पुण्यात भाजपचे आठपैकी सहा आमदार विजयी झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी पुणे शहरावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर ग्रामीण भागावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. तर काँग्रेस मात्र या जिल्ह्यातून हद्दपार झाली आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त एक जागा मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यातील चार उमेदवार हे 1 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. यात कोथरुड मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी १ लाख १२ हजार ४१ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला आहे. तर मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे १ लाख ०८ हजार ५६५ मतांची विजयी झाले आहेत. त्यांनी अन्ना भेगडे या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यापाठोपाठ चिंचवड मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर जगताप हे ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शरद पवार गटाच्या राहुल कलाटे यांना पराभूत केले.
तसेच सर्वांचेच लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार १ लाख ८९९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शरद पवार गटाच्या युगेंद्र पवार यांचा पराभव केला. त्यासोबतच पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ विजयी झाल्या आहेत. तसेच खडकवासालामधून भीमराव तापकीर, कसब्यामधून हेमंत रासने, पुणे कँटोन्मेंटमधून सुनील कांबळे आणि शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे विजयी झाले आहेत.