पुण्यात पुन्हा हिट अँड रन ! भरधाव ऑडी कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोन गाड्यांना दिली धडक

0
129

पुणे, दि. 11 (पीसीबी) : मुंढवा परिसरात आज पहाटे पुन्हा एकदा हिट अँड रन चा प्रकार समोर आला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मुंढवा परिसरात पहाटे दीड वाजता हा अपघात घडला.

ऑडी कारचालक आयुष प्रदीप तयाल (वय ३४, रा. हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे. रुउफ अकबर शेख असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा या परिसरात रात्री उशिरापर्यंत पबमध्ये दारु पिऊन भरधाव कार चालविल्या जाताना दिसून येते. अशाच प्रकारे पोर्शे कार अपघात काही महिन्यांपूर्वी पुण्यात गाजला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज पहाटे घडली.

मुंढव्यातील ए बी सी रोडकडून ताडी गुत्ता चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर ऑडी कारचालकाने प्रथम अ‍ॅक्टिवावरुन जाणार्‍या तिघांना जोरात धडक दिली. त्यात गाडीवरील तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर त्याने एक्सेस दुचाकीवरुन जाणार्‍या रुउफ शेख याला धडक दिली. त्यात शेख जखमी झाला. त्याला तातडीने नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच शेख यांचा मृत्यु झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी कारचालकाचा शोध घेऊन आयुष तयाल याला अटक केली आहे. त्याची ऑडी गाडी जप्त करण्यात आली आहे.