– किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट
मुंबई, दि. २४ (पीसीबी) : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुंबई महापालिकेतील जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी सुजीत पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्यात किरिट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. खोटे कागदपत्र दाखवून मुंबई महापालिकेत कंत्राट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांना हे कंत्राट संजय राऊत यांच्या सांगण्यावरून मिळाल्याचा आणि संजय राऊत हे सुजित पाटकर यांचे पाटर्नर असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. सोमय्यांनी याबाबत आज पत्रकार परिषद सविस्तर माहिती दिली.
किरीट सोमय्या म्हणाले, “सुजीत पाटकर यांनी एक बनावट कंपनी स्थापन केली, ही कंपनी नोंदणीकृत नाही. या कंपनीविषयी मुंबई व पु्ण्यात दोन वेगवेगळी कागदपत्रे असल्याचे समोर आले आहे. पुण्यात जेव्हा तीन रुग्ण दगावले तेव्हा अजित पवारांनी चौकशीचे आदेश दिले तेव्हा समोर आलं होत कि ही कंपनी बोगस आहे. कर्मचारी नाही, तरीही या कंपनीला मुंबईतील वरळीचे कॉन्ट्रॅक्ट दिल गेलं. तर पुण्यात केईएम रुग्णालयाच्या बाहेरील चहा वाल्याच्या बॅक खात्यात १० कोटी रुपये जमा झाले. येथून हे पैसे उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसाच्या खात्यात गेले आहेत,” “मुंबईतील वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, पुण्याच्या जंबो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट या कंपनीने मिळवले होते,” असा आरोप त्यांनी केला आहे.
“आता संजय राऊत व त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळ्याचा सुद्धा हिशोब द्यावा लागेल, सुजित पाटकर यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये आले आणि ते पुढे गेले आहेत,याचा तपास ईडीने करावा, अशी मी त्यांना विनंती केली आहे,” असे सोमय्या म्हणाले. या सर्व प्रकरणासंबधात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुण्यात अनेक मृत्यू झाले तेव्हा या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं होत तरी देखील आदित्य ठाकरेंच्या कृपेने मुंबईतील कोव्हीड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट दिल आहे. याची चौकशी होईल, असं आश्वासन मला ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. मुंबई महापालिकेला शंभर कोटी कोव्हीड सेंटर घोटाळ्याबाबत तक्रार दाखल केली आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी ही अस्तिवात नसलेली कंपनी आहे. उद्धव ठाकरेंचे एक लेफ्ट हॅन्ड आणि एक राईट हॅन्ड आहेत, त्यांच्याकडे पैसे गेले याचा तपास ईडी करणार आहे,” असे सोमय्यांनी सांगितले.
कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीला आघाडी सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिल होते. कंपनीची कोणतीही कागदपत्रे नसताना त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले कसे, असा प्रश्न सोमय्यांनी यावेळी व्यक्त केला. सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता,संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावरही 38 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून 2020 ते मार्च 2022 या कालावधीत लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म व फर्मचे भागीदार हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू साळुंखे यांनी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील वेगवेगळ्या जंबो कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी काढलेल्या बिडस मिळविण्यासाठी यांनी फर्मचे 26 जून 2020 रोजीचे बनावट व खोटे पार्टनरशीप तयार केली. ही पार्टनरशी खोटे व बनावट असल्याचे माहिती असतानाही त्यांनी ही कागदपत्रं सादर केली आहेत, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.