पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; शहराध्यक्षासह 600 जणांचे राजीनामे

0
53

पुणे, दि. 16 (पीसीबी) : गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल नियुक्ती आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. या सात जणांमध्ये अजित पवार गटाकडून नेते आणि छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. तर शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. आता यावर अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे शहराध्यक्षासह तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे.

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे नाराज झाले आहेत. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, त्यांच्यासोबत पुणे शहरातील अजित पवार गटाच्या तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे. नुकतंच याबद्दल अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.

मी 2012 पासून पक्षाचं काम करतोय. गेले 14 महिने शहर अध्यक्ष म्हणून काम करतोय. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकारी यांनी केली होती. पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवडे यांना संधी दिली. मग मला नाकारण्याचं कारण काय? मला इतर माणसासारखं पुढे पुढे करता येत नाही. कार्यकर्त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत. मी स्वतः राजीनामा देतो. कार्यकर्त्यांनी राजीनामा माघारी घ्यावे. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांबद्दल तत्परता दाखवली. ती आमच्याबद्दल का दाखवली नाही? असा प्रश्नही दीपक मानकर यांनी उपस्थित केला आहे.

भुजबळ साहेबांच्या घरात सगळी पद दिली तर इतर कार्यकर्त्यांना संधी कधी देणार. मी शनिवारपर्यंत हा राजीनामा अजित पवारांकडे देणार आहे. दीपक मानकरांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी केली होती. अजित पवारांच्या हातात हे सगळं असून पंकज भुजबळ यांना संधी दिली पण मला मात्र डावलले? अशा शब्दात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महायुतीला याचा फटका कुठल्या कुठे बसेल सांगता येत नाही. पक्षांमध्ये एकतर्फी प्रेम करून चालत नाही नेत्याचं पण प्रेम असणे गरजेचे आहे. रुपाली चाकणकर आणि मला महानगरपालिकेचे तिकीट द्या, मग कोणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळेल. सत्तेचे विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. सुनील तटकरे अध्यक्ष आहेत. आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मला इतर पक्षातून ऑफर येत आहेत. पण मी अजित पवारांसोबत राहणार. आम्ही महायुतीचे काम करणार. पण जर मला संधी द्यायची नव्हती तर मग मला सांगायला हवं होतं. आम्ही जर ठरवलं तर निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसेल, असेही दीपक मानकर यांनी म्हटले.