पुण्यातील ५० बिल्डर्सना महारेरा चा मोठा झटका

0
300

पुणे, दि. 24 (पीसीबी) – गृहप्रकल्पांची जाहिरातबाजी करताना क्यूआर कोड न छापणाऱ्या बिल्डर (Builders) आणि विकसकांवर महारेराने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील अनेक बिल्डरांना दंड ठोठावत दणका दिला आहे. या बिल्डरांना सक्त ताकीद देत दहा हजार ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचा दंड करण्यात आला आहे. महारेराने १ ऑगस्टपासून गृहप्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिराती, अगदी वेबसाइटवरदेखील क्यूआर कोड छापणे कायद्याने बंधनकारक केले आहे. जे बिल्डर गृहप्रकल्पातील सोयीसुविधांबाबत पेपर, होर्डिंग, बॅनर, प्रदर्शने आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती देतात आणि त्या जाहिरातींच्या माध्यमातून चौकशी आणि बुकिंग घेतात, त्या सर्वांना हा नियम लागू करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुण्यातील दोनशेहून अधिक बिल्डरांना याबाबत महारेराने जाब विचारला. याबाबत रितसर सुनावणी झाली. समाधानकारक बाजू न मांडणाऱ्या सुमारे ५० बिल्डरांना दंड करण्यात आला.
२३ जानेवारी २०२४ रोजी शहरातील शेकडो बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा मिळाल्या होत्या. या नोटिसांच्या आधारे बिल्डर आणि प्रवर्तकांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. शहरातील सुमारे ५० नामांकित बिल्डर्सना १० हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला. या बिल्डरांनी दंडाची रक्कम १० दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे. अन्यथा दररोज त्यांना अडीचशे रुपये दंड करण्यात आला आहे.