पुण्यातील कॅन्टोन्मेंटमधील धक्कादायक प्रकार, नागरिकांमध्ये संतापाची लाट

0
221

पुणे, दि. २० (पीसीबी) – पुण्यातील कॅन्टोन्मेंटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शववाहिनी उपलब्ध नसल्याने वृद्धेचा मृतदेह थेट रिक्षातून नेण्याची गंभीर बाब नातेवाईकांवर आली आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.वृद्ध आजी रुक्मिणी मोहिते (वय ९५) यांचे सोमवारी रात्री १० च्या सुमारास निधन झाले होते. त्यामुळे, आजीचा मृतदेह नवा मोदीखाना कॅम्प येथून केवळ ५०० मिटर अंतरावर असलेल्या पटेल रुग्णालयात शवागारमध्ये ठेवण्यासाठी जायचे होते. त्यामुळे, नातेवाईकांनी बोर्डाच्या धोबी घाट येथील वाहन तळ गाटले. मात्र त्याठिकाणी शववाहीनी चालवण्यासाठी चालकाच रात्री उपलब्ध नसल्याचे भयंकर प्रकार समोर आला.धक्कादायक बाब अशी होती की हे सरकारी रुग्णालय आहे. यावेळी वाहनतळ प्रमुख बंडू गुजर आणि सहाय्यक अशपाक शेख यांना फोन केला असता फोनही बंद आला.

शेवटी नाईलाजाने शवाला रिक्षामधून पटेल रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या शवागारात घेऊन जाण्यात आले. मात्र, शवागारही बंद होते. याबाबत विचारणा केली असता शवागारात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर निवाशी डॉक्टरांच्या बंगल्याला देखील कुलूप होते.पुन्हा आजींना रिक्षा मधूनच ससून रुग्णालयात शवागारात हलविण्यात आले. रुग्णालयातून कुठल्याही प्रकारची सहायता न मिळाल्याच्या आरोप आजीचे नातू विक्रम मोरे यांनी केला आहे. मात्र, निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ उषा तपासे यांनी माझ्याकडे कोणीही विचारण्यास आले नाही. मी ऑन ड्युटी रुग्णालयातच असते. या प्रकरणात माझी व माझ्या स्टाफची कुठल्याही प्रकारची चूक नाही, असे म्हणत नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.