पुण्यातल्या भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी

0
220

पुणे, दि.२५ (पीसीबी) – : पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर आरोपीने खंडणीसाठी मेसेज केले आहेत. या नंबर वरून त्याने गुगल पे द्वारे दोन ते पाच लाख रुपयांची वारंवार मागणी केली. हे पैसे न दिल्यास माधुरी मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची देखील धमकी त्याने दिली. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर या दरम्यान घडला.

इम्रान समीर शेख (रा. 79, विकास नगर, घोरपडी गाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आमदार मिसाळ यांचे दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांनी तक्रार दिली होती. शेख दररोज मेसेज करून आमदार मिसाळ यांना त्रास देत होता. पैसे न दिल्यास दीपक मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती.

या दोघांच्या मोबाईलवर मेसेज करून शेख दोन ते पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी 386, आयटी ॲक्ट कलम 66 (सी) यानुसार गुन्हा दाखल केला आहे. शेख याच्याविरुद्ध अशाप्रकारचे काही गुन्हे चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.