पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक व्हावे

0
2

पिंपरी, दि. १४ – देशासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक भोसरी विधानसभा मतदारसंघात उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय खेळाडू आणि समाजसेवक अरुण सर पाडुळे यांनी केली आहे. त्यांनी आज भोसरीचे आमदार आणि हिंदुत्ववादी नेते महेश किसनराव लांडगे यांना यासंदर्भात निवेदन सादर करून स्मारकाच्या उभारणीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार, उत्तम न्यायव्यवस्था आणि आदर्श प्रशासनाची पायाभरणी करून एक आदर्श शासिका म्हणून इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पाडुळे यांनी निवेदनात नमूद केले.

पिंपरी चिंचवड शहरात धनगर समाजाचे मोठे प्रमाण असल्याने, त्यांच्या श्रद्धास्थानी असलेल्या पुण्यश्लोक मातेचे स्मारक हे समाजाच्या भावना जोपासणारे ठरेल. स्मारकाभोवती अहिल्यादेवींच्या जीवनप्रवासावर आधारित शिल्पाकृती उभाराव्यात, जेणेकरून त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि प्रेरणा मिळेल, अशीही मागणी पाडुळे यांनी केली. या मागणीला भोसरी मतदारसंघातील नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला असून, लवकरच या मागणीला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येईल, असे संकेतही यावेळी देण्यात आले.