पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्काराने “बाबा कांबळे यांना सन्मानित

0
124
  • पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पिंपरी येथे पुरस्काराचे वितरण

पिंपरी चिंचवड शहरामध्ये देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार 2024 यावर्षी कष्टकरी व कामगारांचे नेते बाबासाहेब कांबळे यांना प्रदान करण्यात आला. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मोरवाडी पिंपरी येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक नाना काटे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय ताणले, सदस्य राजू दुर्गे, गणेश खरात, बंडू मरकड, मीना सोनवलकर, आशा काळे आदीसह मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी पुरस्काराला उत्तर देताना बाबा कांबळे म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी या कर्तव्यनिष्ठ विज्ञानवादी व राजधर्म पाहणाऱ्या होत्या. राजधर्म पाळत असताना सत्याची बाजू घेऊन त्यांनी आपल्या मुलाला देखील शिक्षा ठोठाविण्याचा निर्णय घेतला. पुणे येथे नुकतेच एका बिल्डराच्या मुलाने दोन व्यक्तींना चिरडून ठार मारण्याची घटना घडली. त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी बिल्डर असणारा बाप मुलाच्या चुकांवर पांघरून घालून पुढे सरसावला. सर्व यंत्रणा खरेदी करण्याचा प्रयत्न केला. रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला चुका करूनही मुलांना पाठीशी घालणारे आई बाप तर दुसरीकडे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्याच मुलाला केलेली शिक्षा हे आदर्श राज्यकर्त्यांचे उदाहरण आहे. अहिल्यादेवींचे विचार समाजाच्या तळागाळामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे. त्यांचा नावाने मला पुरस्कार दिला, हे मी माझे भाग्य समजतो, असे बाबा कांबळे म्हणाले. या पुरस्कारामुळे ऑटो, टॅक्सी व गोरगरीब कष्टकऱ्यांच्या लढ्याला बळ मिळेल, असा विश्वास बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.