– भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदला; अन्यथा आगामी महापलिका निवडणूक जिंकणे अवघड
पुणे, दि. २६ (पीसीबी) : पुणे भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदला; अन्यथा आगामी महापलिका निवडणूक जिंकणे अवघड होईल, असा इशारा देत माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी भाजपमध्ये ठिणगी टाकली आहे. तसेच, पुणे शहराध्यक्षपदाची धुरा माजी महापौर तथा भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ अथवा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे द्यावी, अशी मागणीही केसरकर यांनी केली आहे, त्यामुळे आता भाजप नेतृत्व काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे भाजपला गटबाजी नवी नाही. पूर्वी मुंडे गट आणि गडकरी गट अशी गटजाबी असायची. त्यावेळी शहराध्यक्षपदावरून विकास मठकरी आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्यातील बेबनाव पुढे आला होता. त्याची जोरदार चर्चा शहरासह संपूर्ण राज्यात झाली होती. त्यानंतर मधल्या काळात शहराचे नेतृत्व कोणी करायचे, यावरूनही दोन मोठ्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध होते. तसेच, भाजपच्या बालेकिल्ला मानले गेलेल्या कोथरूडमधील नेत्यांमध्येही किती सख्य आहे, हे सर्व पुणे शहर जाणून आहे, त्यामुळे शहरात मजबूत वाटणाऱ्या भाजपमध्ये गटबाजीही तेवढीच आहे.
माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्या एका ट्विटच्या पोस्टने पुण्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आली आहे. केसरकर यांनी त्या पोस्टमध्ये थेट शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुळीकांना बदला; अन्यथा महापालिकेची सत्ता विसरा, असा इशाराच दिला आहे.
माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात बदल करणे आता गरजेचे आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे किंवा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हातात पुणे भाजपचे नेतृत्व दिले पाहिजे. नेतृत्व बदल झाला नाही तर आगामी महापालिका जिंकणे भाजपसाठी अवघड होईल. विद्यमान शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांना खासदारकी द्या आणि पुनर्वसन करा. पण, शहराध्यक्ष तातडीने बदलले पाहिजे, भूमिका महापालिकेत विरोधी पक्ष नेते म्हणून राहिलेले भाजपचे उज्ज्वल केसकर यांनी मांडली आहे.