पुणे शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी;उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली प्रशासनाकडून माहिती

0
98

नागरीकांनी काळजी घ्यावी;
आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सज्ज रहावे
-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहर परिसरातील पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

मुंबई, दि. 8:- पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि.8 जून) सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

पुण्यात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, याची तातडीने दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषयीची माहिती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.