पुणे शहरातून फडणवीस यांना खासदारकी द्या – ब्राम्हण महासंघाची मागणी

0
299

– मोदी यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १९ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर भाजपला सक्षम नेतृत्व देणाऱ्या पहिल्या दोन तीन नावांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. त्यामुळे २०२४ मध्ये फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली. प्रत्येकवेळी अखिल भारतीय महासंघ पुण्यात भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे, त्यामुळे 2024 ला देखील देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा आशयाचे पत्र देखील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लिहिलं आहे.

‘तुम्ही फडणवीस यांची जी निवड केली आहे ती अतिशय सार्थ असून दिल्लीतलं राजकारणाची फडणीस यांची सुरुवात पुण्यातून हवी’ अशी इच्छा देखील अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून व्यक्त करण्यात आली. भाजपने नुकतीच संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली. संसदीय मंडळात मोठा बदल करत नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना हटवण्यात आलं. याशिवाय 15 सदस्यीय केंद्रीय निवडणूक समितीतही या नेत्यांना स्थान मिळालेले नाही.

दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र भाजपने केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश केला आहे. या निर्णयाकडे महाराष्ट्र आणि केंद्रातील मोठा राजकीय बदल म्हणून पाहिले जातंय. एकीकडे प्रसिद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून हटवल्यामुळे त्यांचे डिमोशन केल्याची जोरदार चर्चा आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीतील वजन वाढल्याने त्यांना प्रमोशन मिळाल्याचे बोलले जात आहे.