नाशिक,दि. ४ (पीसीबी) : पुण्यात मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यासह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बदलापूरच्या प्रकरणानंतर आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘बदला पुरा’, असा आशयाचे बॅनर झळकले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे अत्याचार प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले की, त्या तिघांचे एन्काऊंटर फडणवीसांनी करावे. जे बदलापुरात फडणवीस आणि मिंधेंनी केलंड तेच इथेही करावे. एका अल्पवयीन मुलीवर तिघेजण बलात्कार करतात हे बदलापूरपेक्षा भयानक घटना आहे. फडणवीसांनी आपल्या कमरेला जे पिस्तूल आहे ते त्यांनी काढावे आणि फोटोमधून बाहेर यावं. फटा पोस्टर आणि निकला क्या खलनायक असं चालणार नाही. सरकारने एन्काऊंटर करावं. पोस्टरमधून त्यांनी बाहेर यावं, असे हल्लाबोल त्यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय.
मिंधे सरकारकडून तिघांमध्ये भांडण लावण्याचे काम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण उपोषण करत आहेत. मिंधे सरकारकडून तिघांमध्ये भांडण लावण्याचे काम सुरु आहे.
आमचं सरकार आला तर…
केंद्राने आरक्षण वाढवून देण्याची गरज आहे. आम्ही वारंवार हेच सांगत आहोत. आमचं सरकार आला तर आम्ही 50 टक्क्यांवर आरक्षण देऊ. तात्काळ आरक्षण वाढवून सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. तामिळनाडूमध्ये आरक्षण टिकलेले आहे. बिहारचे आरक्षण टिकले नाही, राज्य सरकारने देखील हा विषय केंद्राकडे न्यायला पाहिजे. आंदोलन कसे चिरडायचे हे आम्हाला महिती आहे, असं गृहमंत्री सांगतात. जरांगे यांच्या आंदोलनाला किंमत देत नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
सावरकरांना राज्य माता हा दर्जा मान्य नाही
स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते. पण ते गोमांस खात होते, असा दावा कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी केला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला त्याविषयी माहित नाही. असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही. काँग्रेसने, भाजपने यावर बोललं पाहिजे. सावरकरांनी विज्ञान दृष्टीकोन ठेवला. खाण्या पिण्यावरून हिंदुत्व आणि इस्लाम ठरत नाही. सावरकरांनी गाई उपयुक्त पशु म्हटले आहे. सावरकरांच्या दृष्टीने गायी हे एक उपयुक्त पशु आहे. गाय बैलांची माता होती, असं सावरकरांचे म्हणणं होतं. सावरकरांना राज्य माता हा दर्जा मान्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.