– सायंकाळचे सहा वाजण्याची शक्यता, गणेश भक्तांचा उत्साह कायम
पुणे, दि. १० (पीसीबी) – दुपारचे बारा वाजून गेल्यानंतरही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अद्याप संपण्याची चिन्हे नाहीत. लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, शास्त्री रस्ता येथेही मंडळांच्या रांगा आहेत. एकंदर स्थिती पाहता कमीत कमी पाच वाजून जातील असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त होत असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा मिळत आहे.
राज्यात नव्याने आलेल्या सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे आणि गेली दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सवातील उत्साहावर विरजण पडल्याने यंदाची मिरवणूक जोमात आणि जोशात होणार, असा सर्वांचाच अंदाज होता. उत्सवाच्या काळातही कार्यकर्ते आणि भाविक यांचा उत्साह ओसंडून वाहाताना दिसून आला. दरम्यान, या सर्व परिस्थितीत गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचे दिसले.
विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून लवकरता लवकर संपवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गणेश मंडळांना केले होते. मात्र त्याचा कोणत्हा परिणाम झालेला दिसून आला नाही. एकेक मंडळ दीर्घ काळ मार्गावर थांबून राहात असतानाही, पोलिसांनी कोणत्याही स्वरूपाची जबरदस्ती केली नाही आणि कारवाईचा बडगाही उचलला नाही. त्यामुळे मानाचे गणपती विसर्जित होण्यासच सुमारे अकरा तास लागले. त्यानंतरही विशेष आकर्षण असलेल्या दगडूशेठ आणि मंडई मंडळाच्यागणपतींना मिरवणुकीत सहभागी होण्यास दरवर्षीपेक्षा विलंब झाला. प्रचंड गर्दीतही टिळक चौकातून किमान सात रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत वेळेत पोचविण्यात आल्या.