– प्रसेनजीत फडणवीस यांच्यासह पॅनलचे पिंपरी चिंचवड भाजपची बैठक
पिंपरी, दि. 16 (पीसीबी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर निवडणूकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेत ‘पुणे विद्यापीठ सिनेट’ निवडणूकीत ’विद्यापीठ विकास मंच’ पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडूण यावे याकरिता भाजपा शहर कार्यालयात पक्षाचे सर्व सन्मानिय नगरसेवक, नगरसेविका व सर्व मंडल अध्यक्ष यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी पुणे विद्यापीठ विकास मंच सिनेट निवडणूकीचे समन्वयक राजेश पांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते सोबतच चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, सौ.उषा उर्फ माई ढोरे, सिनेट उमेदवार प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, संतोष ढोरे, राहुल पाखरे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, पिं.चि.नवनगर विकास प्राधीकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चौंधे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे यांसह पक्षाचे सर्व सन्मानिय नगरसेवक, नगरसेविका व सर्व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व राजेश पांडे यांनी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना पिंपरी चिंचवड शहरातून जास्तीत जास्त मते कशी मिळतील याचे नियोजन आणि योग्य असे मार्गदर्शन केले.
बैठक यशस्वी व्हावी याकरिता भाजपा पिंपरी चिंचवड महानगर सिनेट निवडणूक समन्वयक व भाजपा जिल्हा महामंत्री ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी परिश्रम घेतले.