पुणे विद्यापीठात धुडगूस घालत तोडफोड करण्याची कृती, २० जणांवर गुन्हा दाखल

0
177

– चूक अभाविप ची नाही तर त्यांच्या मार्गदर्शकांची.- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

पुणे, दि. २५ (पीसीबी) – पुणे विद्यापीठाच्या कार्यालयात जाऊन रॅप सॉंग चित्रीकरण करण्याचा प्रकार मागील काही दिवसात समोर आला होता. या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने संबंधित प्रकाराची चौकशी करून विद्यापीठाच्या ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या चित्रीकरणाला परवानगी दिली त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम केले. त्यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांची बाजू घेत प्रशासनाला जबाबदार धरण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. चूक अभाविप ची नाही तर त्यांच्या मार्गदर्शकांची असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले.

या घटनेकडे राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार साहेब यांनी देखील लक्ष घालत विद्यापीठ प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली होती. काल विद्यापीठाची सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रीतसर निवेदन याबाबतीत विद्यापीठ कुलगुरूंना दिले व कारवाई करण्याची मागणी केली.

मात्र कालच याबाबतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात धुडगूस घालत विद्यापीठाच्या चालू बैठकीत शिरून गोंधळ घातला आणि या पलीकडे जाऊन कार्यालयाच्या दारांच्या काचा देखील फोडल्या गेल्या. विद्यापीठ प्रशासनाने रॅप सॉंग ला परवानगी देऊन चूक केली हे मान्यच. मात्र त्यांच्या या कृतीचा याप्रकारे धुडगूस घालून, फोडाफोडी करून निषेध करण्याच्या कृतीचे समर्थन कसे करता येईल. अभाविप चे वरिष्ठ पदाधिकारी त्याचबरोबर अभाविप चे मार्गदर्शक असलेले भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कृतीचे समर्थनच करतील.

समाजामध्ये भेदाभेद करून, सतत सातत्याने प्रत्येक घटना आणि मुद्यां च्या बाबतीत हिंसक आक्रमक मांडणी करून राजकारण करण्याचे भाजप आणि आर एस एस च्या नेत्यांचे तंत्र हे समाजाला आणि देशाला घातकच होते आणि आजही आहे. चर्चा करून, आग्रह धरून सुद्धा प्रश्न सोडवले जाऊ शकतात, या विचारधारेवर ज्यांचा विश्वासच नाही आणि केवळ मानवाच्या आंतरीक हिंसेला खतपाणी घालून मूळ प्रश्न न सोडवता स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी भडक विधाने करून प्रसिध्दी मिळवण्याची स्पर्धा भाजपाच्या नेत्यांमध्ये लागली असताना त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिच कला अवगत केली यात त्यांचा तरी दोष काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणत्या प्रकारच्या मानसिकतेचे तरुण उभे करायचे आहेत, हे इतिहासात घडलेल्या असंख्य घटनांवरून स्पष्ट झालेच आहे आणि आजही ते हेच करत आहेत. खरा प्रश्न विद्यार्थी तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी समजून घेण्याचा आहे. आपण कोणत्या दिशेला आपल्याला घेऊन जात आहोत याचा विचार करण्याचा. कालच्या घटनेमुळे ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले ते आणि त्यांचे पालक विचार करणार का? हा मुळ प्रश्न आहे?