पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती

0
289
  • मार्गिकेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात खर्चास मंजुरी, खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – तत्कालीन राज्य सरकारच्या अनास्थेमुळे रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. या मार्गिकेचा 50 टक्के खर्च करण्यास अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. त्यामुळे मार्गिकेचे काम लवकरच सुरु होईल. मार्गिकापूर्ण झाल्यानंतर लोकल वेळेत धावतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. वेळेत कार्यालय, महाविद्यालयात जाता येईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने 2015-16 मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यासाठी 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. परंतु, डीपीआर तयार करताना त्याचा खर्च 1600 कोटी होता. 2022 मध्ये खर्च 2200 कोटी रुपयांवर गेला. आता 5 हजार 100 कोटी रुपयांपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा खर्च गेला आहे. त्यात जागा भूसंपादनासह सर्व कामाचा समावेश आहे. याचा 50 टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि 50 टक्के राज्य सरकार अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या 50 टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने तत्कालीन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. बैठक घेण्याची मागणी केली. परंतु, बैठक घेतली नाही. सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. 50 टक्क्यांच्या हिस्सा दिला नाही. त्यामुळे प्रकल्प रखडला होता.

शिवसेनेचे मुख्य नेते, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर खासदार बारणे यांनी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी दोनवेळा बैठक घेऊन माहिती घेतली. हा प्रकल्प महारेल की केंद्र सरकार करणार यामध्ये रखडला. त्यानंतर पुन्हा खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिस्सा देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार 50 टक्के हिस्सा देण्यास अर्थसंकल्पात मान्यताही दिली आहे. यामुळे यामुळे तिसरा, चौथा ट्रॅक मार्गी लागणार आहे. तिस-या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवडहून मुंबईला जाणा-या प्रवाशांसाठी अधिकच्या गाड्यांची सुविधा उपलब्ध होईल. नोकरदारांना कामावर वेळेवर पोहोचता येईल. नोकरदारांची लेटमार्कपासून सुटका होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उमुख्यमंत्र्यांचे आभार
तिस-या आणि चौथ्या ट्रॅकची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रत्येक रेल्वेमंत्र्यांकडे बैठक घेतली. त्यानंतर राज्य सरकारने 50 टक्के हिस्सा उचलावा यासाठीही प्रयत्न केले. पण, मागील सरकारने याकडे सकारत्मकपणे पाहिले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 50 टक्के खर्चाला मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उमुख्यमंत्र्यांचे मी मावळवासीयांच्या वतीने आभार मानतो. आता लवकरच काम सुरु होईल, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.