पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी

0
71

पुुणे, दि. ३१ (पीसीबी) : मुंबई-पुणे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचा धागा असणाऱ्या पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा करत या प्रकल्पातील राज्याच्या वाट्यासंदर्भात चर्चा केली. त्यावर राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे.

गेली अनेक वर्षे मागणी असतानाही पुणे-लोणावळा रेल्वे मार्गिकेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचा प्रश्न प्रलंबित असून केंद्र आणि राज्य सरकारच्या समान वाट्याचा मुद्दाही प्रलंबित होता. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने वाटा उचलावा, या संदर्भात मोहोळ यांनी भेट घेतल्यावर त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘राज्य सरकारने या प्रकल्पाच्या निम्म्या वाट्यासंदर्भात सकारात्मकता
दर्शवली असून पुढील पाठपुरावा केंद्र सरकारकडे करणार आहे. या दोन्ही मार्गिकांचा प्रश्न मार्गी लागल्यावर पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक वेगाने होणार असून मालगाड्यांचा वेग वाढणार आहे. शिवाय मालगाड्यांची कोंडी टाळता येणार आहे’.

‘पुणे-लोणावळादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकलची संख्या वाढवता येणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
त्यामुळे प्रकल्पाचा वाढणारा खर्च आणि विलंब लक्षात घेता, याचा पाठपुरावा करुन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा
प्रयत्न आहे’, असेही मोहोळ म्हणाले.