पुणे- लोणावळा रेल्वे तिसऱ्या- चौथ्या मार्गिकेचे काम लवकरच

0
302

लोणावळा, दि. १ (पीसीबी) : पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’कडून (एमआरव्हीसी) करण्यात येत आहे. मात्र, हा प्रकल्प कोण पूर्णत्वाला नेईल, याबाबत स्पष्टता नसली तरी मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाला अशा कामांचा अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडून या प्रकल्पाचे काम केले जाण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसंदर्भात बैठक झाली. बैठकीत या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’कडे (महारेल) देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. रेल्वेचे प्रकल्प कोणत्या विभागाला द्यायचे याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेते. ‘महारेल’कडे अशा प्रकल्पाचे काम करण्याचा अनुभव नाही. ही कंपनी केवळ नवीन मार्गिका टाकण्याचे काम करते.

पुणे-लोणावळा दरम्यान आताच्या दुहेरी मार्गिकांच्या शेजारी आणखी दोन मार्गिका टाकण्यात येणार आहेत. पुणे ते लोणावळा हे अंतर ६३ किलोमीटर आहे. या दरम्यान एकूण १७ स्थानके आहेत. सध्याच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या बाजूलाच दोन नव्या मार्गिका टाकण्यात येणार आहेत. मात्र, मार्गिकांना स्थानकांना जोडण्याचे काम अत्यंत अवघड आहे. या कामांसाठी ‘यार्ड रिमॉडलिंग’ करावे लागणार आहे. यात सिग्नलचे खांब बदलावे लागतील; तसेच रुळांचेही काम केले जाणार आहे. त्यामुळे हे काम रेल्वेशिवाय अन्य संस्थांकडे सोपवणे अवघड आहे.

ओडिशातील बालासोरच्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासन सिग्नल आणि ब्लॉकच्या बाबतीत खूपच संवेदनशील झाले आहे. या पद्धतीचे काम करण्याचा अनुभव ‘महारेल’कडे नाही. ‘एमआरव्हीसी’ला या कामांचा अनुभव असला, तरी त्यांचे काम केवळ मुंबईपुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा प्रकल्पाचे काम रेल्वेकडूनच केले जाण्याची शक्यता आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान मार्च १९७८मध्ये लोकल सेवा सुरू झाली. तेव्हापासून या मार्गावर तिसरी मार्गिका टाकण्याची मागणी केली जात आहे. सध्या पुणे-लोणावळा या मार्गावर ४२ लोकल, ८०हून अधिक एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट एक्स्प्रेस धावतात. या मार्गावर दोनच मार्गिका असल्याने उपनगरीय वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या सेवेचा विस्तार करणेही शक्य होत नाही. परिणामी, तिसरी आणि चौथी मार्गिका उपलब्ध झाल्यास लोकल सेवा दर पंधरा मिनिटांनी सुरू करणे शक्य होणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.