पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल अशक्य

0
2
oppo_0

पिंपरी, दि . १८ . पीसीबी – पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याची सातत्याने मागणी करूनही केंद्र सरकारने ‘नाही’ असा स्पष्ट पवित्रा घेतल्याने हजारो प्रवाशांना पुन्हा गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिलेल्या लेखी पत्रात “रेल्वे ट्रकच्या दुरुस्तीच्या कामामुळे दुपारी १२ ते ३ या वेळेत लोकल गाड्या चालविणे शक्य नाही,” असे नमूद केले आहे.

त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी व औद्योगिक कामगार यांचे हाल मात्र सुरूच राहणार आहेत. कोरोना साथीपूर्वी या कालावधीत दोन लोकल गाड्या नियमित धावत होत्या. कोरोनानंतर देशभरातील रेल्वे पुन्हा सुरू झाल्या असताना केवळ पुणे-लोणावळा मार्गावर दुपारच्या लोकल बंद ठेवणे हा दुजाभाव असल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी सभागृहात मुद्दा मांडला, तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना वेळोवेळी पत्रे दिली, मात्र आजवर सकारात्मक निर्णय न झाल्याने प्रवाशांच्या अपेक्षांना तडा गेला आहे.

तळेगाव, पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीत दुसऱ्या शिफ्टला जाणाऱ्या कामगारांना मोठा फटका बसतो. विद्यार्थी व महिला प्रवाशांना देखील या वेळेत ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय प्रवाशांविरोधी असून लोकल सेवेच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासणारा आहे.