पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार श्रीरंग बारणे यांची संसदेत मागणी

0
243

पुणे,दि.०५(पीसीबी) – पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे हाल होत आहेत. नागरिकांमध्ये याबाबत आंदोलनाची भावना वाढत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत लोकल गाडी सुरु करण्याची मागणी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट संसदेत केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन आता बंद आहे.

या कालावधीत देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तीन तास ब्लॉक घेतला जात असल्याचे कारण रेल्वे विभागाकडून दिले जात आहे. मात्र याच कालावधीत मालगाड्यांचे संचालन पूर्ण क्षमतेने होत आहे. मालगाड्या चालवून रेल्वे विभाग आर्थिक लाभ घेत आहे. परंतु प्रवासी गाड्या बंद करून देखभालीचे कारण दिले जात आहे.

याबाबत रेल्वे मंत्रालयाला खासदार श्रीरंग बारणे यांनी यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. तरी देखील रेल्वे विभागाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुणे-लोणावळा मार्गावर विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार, पर्यटक अशा अनेक घटकातील हजारो प्रवासी प्रवास करतात. तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड मधील औद्योगिक वसाहतींमध्ये दुसऱ्या शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी साडेअकरा ते अडीच वाजताच्या कालावधीत येणाऱ्या लोकलचा मोठा फायदा होऊ शकतो. तीन तास लोकल नसल्याने रेल्वे स्थानकांवर विद्यार्थी इतरत्र भटकत राहतात. यामुळे गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत लोकल नसल्याने नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाबाबत चीढ निर्माण होत आहे. नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेत लोकल सुरु न केल्यास आपणही या जनआंदोलनात सहभाग घेणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच वरील कालावधीत लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.