नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळ व केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) यांची फेररचना करण्यात आली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सीईसीत समावेश करून पक्षाच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने त्यांना ‘चलो दिल्ली’ चा मेसेज दिल्याचे स्पष्ट आहे. या समितीवर निवड झाल्याने केंद्रातील राजकारणात फडणवीसांचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाठोपाठ पर्याय म्हणून फडणवीस यांचे नाव घेतले जाते. आगामी काळात फडणवीस दिल्लीत गेले तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी गेल्याच आठवड्यात केले होते. दरम्यान, फडणवीस यांचे नाव आता भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून पुणे शहरातून चर्चेत आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या आधी अनेक राज्यामध्ये निवडणूक प्रभारी म्हणून काम केले आहे. मात्र, केंद्रीय पातळीवरील महत्त्वाच्या समितीमध्ये ते नव्हते. केंद्रीय निवडणूक समितीवर त्यांची निवड झाल्याने आता त्यांना दिल्लीत बोलवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा मानस असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस यांचा समितीत समावेश करून भाजपने त्यांच्या ‘महाराष्ट्र-मोहा’वरही इलाज केल्याचे जाणकार मानतात. फडणवीस यांना दिल्लीत हलविण्याची ही पहिली पायरी आहे. राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमध्ये फडणवीसांच्या इच्छेविरूध्द उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्याचा जाहीर आदेश दिल्लीतून सार्वजनिकरीत्या देऊन पक्षनेतृत्वाने जो मेसेज दिला होता त्याचाच हा पुढचा अध्याय म्हणजे त्यांची वर्णी सीईसीत लावणे हा असल्याचे सांगितले जाते.
तसेच २०२४ मध्ये फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीत उभे करण्याचे पक्षनेतृत्वाने ठरविले असल्याचीही चर्चा आहे. त्यांच्यासाठी मतदार संघावरही विचार सुरु आहे. फडणवीस यांना पुण्यासारख्या भाजपसाठी सुरक्षित असलेल्या मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचीही भाजप केंद्रीय नेतृत्वाची ‘अंतस्थ’ योजना असल्याची चर्चा आहे. पुणे हा भाजपसाठी सुरक्षीत मतदार संघ मानला जातो. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपचे खासदार विजयी झाले आहेत. त्यामुळे नागपूर येवजी फडणवीसांसाठी पुण्याच्या पर्यायावर दिल्ली दरबारी चर्चा सुरु आहे.