पुणे म्हाडा अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची फेरनियुक्ती

0
68

पुणे, दि. २४ (पीसीबी) : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (पुणे) म्हाडा अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मंगळावारी (दि.२३) फेरनियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकिपूर्वी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने कुठेही कायदेशीर अडचण नको म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार ते स्वीकारणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याने आढळराव यांचा शिरूर हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्य शासनाचे उपसचिव अजित कवडे यांनी काल याबाबतचे आदेश प्रसृत केले. या पदाचा कार्यभार यापूर्वी कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे आणि एकत्रित राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी सांभाळला आहे. हे पद २०२० पासून रिक्त होते. प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे, प्रादेशिक मंडळाच्या दोन प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामे म्हाडाच्या माध्यमातून त्यांना कामे करता येणार आहे. घाटगे यांनी हे पद एक ते दीड वर्ष सांभाळले होते. त्यांच्यापूर्वीही काही वर्षे हे पद रिक्त होते. पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी हे पद भूषविले होते. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या सूचनेवरून आढळराव यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. आढळराव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे.