पुणे मेट्रचा प्रवासी संख्येचा पुन्हा उच्चांक; गणेशोत्सव काळात 20 लाख प्रवाशांची वाहतूक

0
103

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावला आहे. दिवसेंदिवस प्रवशांच्या संख्येत वाढ होत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी, मंगळवारी (दि. 17) तब्बल तीन लाख 46 हजार 663 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. ही प्रवासी संख्या मेट्रोची आजवरची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. यातून मेट्रोला 54 लाख 92 हजार 412 रुपये उत्पन्न मिळाले.

गणेशोत्सव कालावधीत पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक आले. भाविक प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो कडून अधिक फेऱ्या सोडल्या. सात सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत या फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या.

नियमित दिवशी मेट्रो सेवा रात्री दहा वाजता बंद होते. मात्र गणेशोत्सव कालावधीत ही सेवा वाढवली होती. सात ते नऊ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सुरू होती. तर 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत मेट्रो सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत 24 तास मेट्रो सुरू राहिली.

पिंपरी ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर प्रवाशांनी मंगळवारी प्रचंड प्रतिसाद दिला. मंगळवारी सकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तब्बल तीन लाख 46 हजार 633 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. हा आजवरच्या दैनिक प्रवासी संख्येचा उच्चांक ठरला.

यापूर्वी 14 सप्टेंबर 2024 रोजी दोन लाख 43 हजार 435 प्रवासी संख्येचा उच्चांक होता. गणेश भक्तांनी मेट्रोला पसंती देत यापूर्वीचा दैनिक प्रवासी संख्येचा उच्चांक मोडीत काढला आहे.

गणेश उत्सव काळात (7 ते 17 सप्टेंबर) पुणे मेट्रोने 20 लाख 44 हजार 342 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला तीन कोटी पाच लाख 81 हजार 59 रुपये उत्पन्न मिळाले.

गणेश उत्सव काळात मेट्रोची प्रवासी संख्या आणि मिळालेले उत्पन्न

             प्रवसी संख्या उत्पन्न (रुपयांमध्ये)

7 सप्टेंबर – 117723 1446150

8 सप्टेंबर – 148710 1845220

9 सप्टेंबर – 150042 2502552

10 सप्टेंबर – 149426 2470265

11 सप्टेंबर – 150685 2513825

12 सप्टेंबर – 168564 2788832

13 सप्टेंबर – 176946 2943133

14 सप्टेंबर – 243435 2973589

15 सप्टेंबर – 225644 2795432

16 सप्टेंबर – 166534 2809649

17 सप्टेंबर – 346633 5492412