पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्यात थांबलेल्या कंटेनरला कारची धडक

0
251

पिंपरी, दि. ५ (पीसीबी)- पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे रस्त्यात थांबलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली. यामध्ये कार चालक जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 3) सकाळी घडला.

मंगेश अशोकराव मुंडे (वय 24, रा. गहुंजे, ता. मावळ) असे जखमी कार चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 46/बीएफ 1086) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुंडे हे त्यांच्या कार मधून पुणे-मुंबई महामार्गावरून जात होते. पिंपरी येथे हाफकिन कंपनीसमोर आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर रस्त्यात थांबवला होता. त्या कंटेनरला मुंडे यांच्या कारची पाठीमागून धडक बसली. यामध्ये मुंडे जखमी झाले. तसेच त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.