पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय

0
140

दि २६ मे (पीसीबी ) – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथून निगडीकडे येणाऱ्या मार्गावर जकात नाक्याजवळ एका टेम्पोने कारला धडक दिली. यामध्ये कारसह टेम्पो संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या खाली पडले. यामध्ये कार चालकाला दोन तर कार मधील प्रवाशाला एक पाय गमवावा लागला. हा अपघात 23 मे रोजी सकाळी साडेआठ वाजता घडला.

कार चालक ज्ञानेश्वर नारायण पाटील (वय 35, रा. वडगाव मावळ, पुणे. मूळ रा. टिटवी, ता. पारोळा, जि. जळगाव) यांचे दोन्ही पाय तर कार मधील प्रवासी ओमकार प्रकाश जोशी (वय 29) यांचा डावा पाय कापण्यात आला आहे. याप्रकरणी नारायण शामराव पाटील (वय 65) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ज्ञानेश्वर पाटील हे प्रवासी कार चालवत होते. ते 23 मे रोजी सकाळी प्रवासी घेऊन निगडीच्या दिशेने जात होते. जकात नाक्याजवळ आल्यानंतर त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने (एमएच 14/टीसी 179) जोरात धडक दिली. यामध्ये कार रस्त्याच्या बाजूला असलेला लोखंडी संरक्षक कठडा तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडली. तसेच टेम्पो देखील खड्ड्यात पडला.

या अपघातात कार चालक ज्ञानेश्वर, कार मधील प्रवासी आणि टेम्पो चालक असे तिघे जखमी झाले. दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ज्ञानेश्वर यांचे दोन्ही तर प्रवासी ओमकार जोशी यांचा डावा पाय कापावा लागला. दोन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.