पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खाजगी बस 20 फूट दरीत कोसळली

0
66

मोठी दुर्घटना टळली

खंडाळा, दि. २१ (पीसीबी)

पुणे-मुंबई दुर्गती मार्गावर खंडाळा येथे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने बसला धडक दिली. या अपघातात बस द्रुतगती मार्गावरून वीस फूट खोलदरीत कोसळली. यामध्ये बसमधील 11 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच टेम्पोतील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, एक खाजगी बस (एमएच 03/सीव्ही 5853) सांगोला येथून मुंबई जात होती. बस मध्ये अकरा प्रवासी होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना खंडाळा येथे बसच्या पाठीमागून कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो (एमएच 14/एचयु 1069) भरधाव आला. टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बस दृतगती मार्गावरून 20 फूट खोल खड्ड्यात पडली.

घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बल, डेल्टा फोर्स, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, लोकमान्य ॲम्बुलन्स, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयआरबीचे देवदूत पथक, खोपोलीचे अपघात पथक, एचएसपी व खोपोली पोलिसांनी बस चालकासह अकरा प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.

सर्व प्रवाशांवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्या तिघांना कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.