पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची खासदार श्रीरंग बारणे गुरुवारी करणार पाहणी

0
235

मावळ, 3 मे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’, खंडाळा येथील रस्त्याची केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे अधिका-यांसह गुरुवारी (दि.4) पाहणी करणार आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मावळ मतदारसंघातून जातो. महामार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. अपघाताची कारणे जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी खासदार बारणे हे खंडाळा येथे पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, जिल्हा वाहतूक समन्वयक, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीए आणि एनएचएचे अधिकारी सोबत असणार आहेत.

खासदार बारणे म्हणाले, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. हकनाक लोकांचे बळी जात आहेत. महामार्गावरील अपघाताची कारणे जाणून घेतली जातील. नेमके कशामुळे अपघात होत आहेत, याची माहिती घेतली जाईल. अपघातसत्र रोखण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्याचा आढावा घेतला जाईल. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.