देहूरोड, दि. १७ (पीसीबी) – पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची भीषण धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरक्षः चुराडा झाला. महामार्गावरील उर्से गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे.
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अद्याप मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि तिने ट्रकला धडक दिली. यामध्ये चालकासह दोन प्रवाशांचा जागीच जीव गेला.
हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या सहाय्याने कटरच्या मदतीने कारमधील मृतदेह बाहेर काढवा लागले. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने चुराडा झालेली कार रस्त्याच्या बाजूला केली आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. भरधाव वेगात गाडी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला पार्किंग, लेन कटिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा कारणांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. दुसरीकडे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईला सुरुवात केली असली तरी अपघाताचे सत्र सुरुच आहे