पुणे, मुंबईसहमहापालिकांची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकमत

0
85

दि.०६(पीसीबी) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील पालिका निवडणुकीसाठी एकत्र येताना दिसत आहेत. ठाकरे बंधूंमध्ये पाच महापालिका एकत्र लढण्याबाबत एकमत झालं असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला आहे.

रविवारी (दि. ५) वांद्रे येथील एमसीएमध्ये शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधूंसह संजय राऊत, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. या कौटुंबिक सोहळ्यातील भेटीनंतर राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी न जाता थेट मातोश्री निवासस्थानी जात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

महाविकास आघाडीने राज ठाकरेंसाठी दरवाजे उघड आहेत का, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. त्यात शिवसेना प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नवा पक्ष येणार असेल तर आम्ही विचार करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित लक्षात घेऊ. तसेच महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत, हे राज ठाकरेंना सांगण्याचा अधिकार माझा एकट्याचा नाही. मविआमध्ये तीन पक्ष आहेत. आता शिवसेना आणि मनसेच्या चर्चा सुरू आहेत. आमचे मविआशी उत्तम संबंध आहेत. मविआच्या नेत्यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकचाही समावेश
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झालं आहे. या प्रमुख महापालिकेवर काम करावे लागेल. याशिवाय अशा अनेक महापालिका आहेत, जेथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागात मनसेदेखील आहे. त्यांचीही मदत होईल. कारण काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. या सगळ्याचा विचार पुढील निवडणुकीसाठी करावा लागेल, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.