पुणे महापालिका विभाजनासाठी काँग्रेस आग्रही, स्वतंत्र हडपसर महापालिका कऱण्याची मागणी

0
445

पुणे, दि. १ (पीसीबी) – पुणे शहरात दोन महानगरपालिका अस्तित्वात आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अशा दोन महानगर पालिकांचा पुणे शहरात समावेश होतो. मात्र, पुणे महानगरपालिकेचा भाग असलेला हडपसर भागाची स्वतंत्र महानगरपालिका करा अशी मागणी कायम होत असते. आता अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव संजय बालगुडे तसेच काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी नरेंद्र व्यवहारे आणि ऋषिकेश बालगुडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत, हडपसर-वाघोली भागाची स्वतंत्र महानगरपालिका करा, अशी मागणी केली आहे. पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून हडपसर-वाघोली भागाचे नवी महापालिका करण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.

संजय बालगुडे आपल्या पत्रात म्हणतात, “पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ 1997 साली 143 स्क्वेअर किलोमीटर होती. सन 1997 साली महापालिकेत 23 गावांचा समावेश झाला. 2002 साली त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. तरी आजही या गावांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही. येथील पाणी कचरा व बेकायदा इमारतींचा प्रश्न तसाच आहे. सन 2015 आम्ही पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून आजूबाजूची गावे सामाविष्ट करून क दर्जाची महापालिका करा, अशी मागणी पुणे मनपा ठरावाद्वारे सरकारकडे केली होती.

बालगुडे पुढे म्हणाले, “त्यावेळेस पुण्याच्या बाजूची गावे पुणे मनपा मध्ये सामाविष्ट करण्याचा विचार सरकार दरबारी चालू होता. सदर गावे सामाविष्ट करायची असतील तर महापालिकेस विकासासाठी २५००० हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. तो खर्च सरकारने करावा, अशी आम्ही मागणी केली होती. सन 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यावेळेस आम्ही उपोषण करून त्यास विरोध केला होता. त्याचे कारण गावे समाविष्ट झाली तर प्रशासकीय व्यवस्था तेथील मूलभूत प्रश्न आर्थिक तरतूद व मनुष्यबळ या सर्व बाबी अनेक वर्ष प्रलंबित राहतात.”

“सन 2021 मध्ये आणखी 23 गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. पुणे महानगरपालिकेत आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका जवळजवळ 480 स्क्वेअर किलोमीटर एवढी हद्द झाली. परंतु मनपाच्या उत्पादनात वाढ त्या प्रमाणात होत नाही. सर्वच बाबींना मनुष्यबळ अपुरे पडते. या सर्वबाबींचा पुणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गावातून महापालिकेत यायला नागरिकांना अथवा वार्ड ऑफिस मध्ये तक्रार देण्यासाठी साधारणता दीड ते दोन तास प्रवास करावा लागतो. तसेच मूळच्या पुणे शहरात याचा प्रचंड ताण आलेला आहे, पुणे शहर हे बकाल होत चालले आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुद्धा ओलमडली आहे. सामान्य नागरिक या सर्व बाबींमुळे त्रासून गेला आहे,” असेही बालगुडे म्हणाले.

“मुंबई महापालिकेच्या गेल्या 30 ते 35 वर्षात सहा नव्या महापालिका निर्माण झाल्या. उदाहरणार्थ नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, वसई विरार, पनवेल. याच पद्धतीने पुणे महानगरपालिकेतून आजूबाजूच्या परिसरात नवी महापालिका होणे आवश्यक आहे. काही राजकीय व्यक्तींकडून स्वतःची सत्ता पुणे मनपात येण्यासाठी नव्या महापालिकेचा विचार केला नाही.”