पुणे फेस्टिव्हलमध्येनृत्यकला मंदिरच्या ‘भारत मेरा रंगरंगीला’ ने प्रेक्षक मंत्रमुग्ध

0
73

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) : नृत्यकला मंदिर निगडी या संस्थेने पिंपरी चिंचवड मधील आणि पुण्यातील 140 कलाकारांना घेऊन
भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतींचे विलोभनीय दर्शन, गीत व नृत्यातून साकारणारा ‘भारत मेरा रंगरंगीला’ हा बहारदार कार्यक्रम सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कथ्थक, भरतनाट्यम आणि ओडीशी शैलीतील नृत्याविष्कारातून गणेश वंदनेने झाली. अतिशय नेत्रदीपक नृत्ये यांनी प्रेक्षकांचे मने जिंकले. यामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, आसाम, बंगाल, राजस्थान, केरळ, गुजरात, महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील तसेच आदिवासी संस्कृतींचे संगीत व नृत्यातून विलोभनीय दर्शन घडवत आपल्या वीर जवानांना मानवंदना देत हा कार्यक्रम संपन्न झाला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. या कार्यक्रमात स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या ‘जयोस्तुते’ गीतावर सादर करण्यात आलेली भारतवंदना अप्रतिम होती. तसेच वाघ्यामोरळी, लावणी, कोळी, संतपरंपरा ही महाराष्ट्राची परंपरा दाखवणाऱ्या नृत्यविष्कारांनी मोठी दाद मिळवली. विविध राज्यांचे संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्यांना वन्समोअर मिळत राहिला. कार्यक्रमाची शेवटी देशाची भविष्य असणाऱ्या लहान मुलांनी हातात तिरंगा घेऊन सादर केलेली थीम साँग डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. विविधता आणि रंगांच्या अद्वितीय संगमाने भरलेली ही संध्याकाळ एक ऐतिहासिक क्षण ठरली.

या अप्रतिम कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन नृत्यदिग्दर्शिका तेजश्री अडिगे यांनी केले, नीरजा आपटे ओघवते सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात एकूण १४० कलाकारांनी सहभाग घेऊ विविध समूह नृत्य सादर केली. नृत्य कला मंदिर, सरहद फाउंडेशन, उपासना, बजाज समाज सेवा केंद्र, नंदकिशोर कल्चरल अकादमी आणि आकांक्षा ओडीशी नृत्यालय यांच्या कलाकारांनी तब्बल १६ नृत्य प्रकार सादर केले. यामध्ये अभिनेता मयुरेश पेम, अभिनेत्री अश्विनी मुकदम, नृत्यांगना रुचिता जामदार आणि नृत्य दिग्दर्शन जीवेंद्र गुजराती यांचा ही नृत्यात मोठा सहभाग होता. याप्रसंगी अभिनेत्री पूजा पवार साळुंखे आणि लायन डॉ. दीपक शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अविनाश अडिगे यांनी आभार प्रदर्शन केले.

लीनेश घाडगे, शर्मिला मुजुमदार, संध्या पडूवाल, हेमा यादव आणि मंजूर राथर यांनी साहाय्य नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. या कार्यक्रमाचे निर्मिती व्यवस्थापन – प्रशांत शिंदे, वीणा भोसले, ऑलीविया प्रकाश आणि वैशाली आचार्य, मेकअप – सतीश सांडभोर व सचिन वाघोडे, लाईट्स – सुजय भडकमकर, साऊंड ऑपरेटिंग – सुप्रिया धाइंजे यांचे होते. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, मोहन टिल्लू, अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे आणि सचिन साळुंके उपस्थित होते.