पुणे पोलिस अलर्ट; जरांगेंच्या सभेसाठी पाच डीवायएसपी अन् 500 पोलिसांचा फौजफाटा

0
258

पुणे,दि.२०(पीसीबी) – मराठा आरक्षण मागणीसाठीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या 14 तारखेच्या जालन्यातील अंतरवाली सराटीतील रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सभेनंतर तशीच जंगी सभा पश्चिम महाराष्ट्रात राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे शुक्रवारी होऊ घातली आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. शंभर एकरांवरील या सभेच्या आजूबाजूच्या शेतातील पिके काढून ती जागा पार्किंगसाठी शेतकऱ्यांनी मोकळी करून दिली आहे.

शुक्रवारी सकाळी दहा वाजताच सभा असल्याने अंदाजे तीस हजार मराठा समाज बांधव हे आजच मुक्कामाला राजगुरुनगरला येणार आहेत. त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर उद्या सकाळी केटरर्स असोसिएशनने पन्नास हजार जणांच्या नाष्ट्याची सोय केली आहे. तालुक्यातील 106 गावांतून बसेसमधून समाज सभेला येणार आहे. नगरमार्गे शिवनेरीवर येऊन तेथे वंदन केल्यानंतर जरांगे-पाटील हे राजगुरुनगरला येणार आहेत. दरम्यान, या सभेपूर्वीच त्यांच्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलक युवक सुनील कावळे याने समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने जरांगे-पाटील उद्याच्या सभेत आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

या सभेसाठी पाचशे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल आहे. पुणे ग्रामीणचे एसपी अंकित गोयल यांनी बुधवारी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. या सभेसाठी जिल्ह्यातील पाच डीवायएसपी, वीस पीआय, 45 ‘पीएसआय’सह 500 पोलिस तैनात असणार आहेत. सभास्थळी पार्किंगचा गोंधळ होऊ नये म्हणून अंदाजे पन्नास एकरांत तीन सेक्शनमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. टू व्हिलर, मोटार आणि बससाठी स्वतंत्र पार्किंग आहे. सभेचे ठिकाण पुणे-नाशिक हायवेला लागून असल्याने सभा संपताच तेथील वाहने आणि गर्दीला जाऊ देण्यासाठी हायवे काही वेळ पोलिस बंद करणार आहेत.

जरांगे-पाटील यांच्यासोबत जालन्याहून सव्वाशे गाड्यांचा ताफा आहे. छत्रपती संभाजीनगरहून दीडशे, तर लगतच्या नाशिक जिल्ह्यातून दोनशेपेक्षा अधिक गाड्या राजगुरुनगरच्या सभेसाठी येणार आहेत. एकूण रागरंग पाहता अंतरवाली-सराटीनंतर ही मोठी किमान पाच लाख गर्दीची सभा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने तयारीही केली गेली आहे. सभामंडप उभारण्यात आला असून, मैदानात भोंगेही बसवले गेले आहेत. अंतरवालीच्या सभेत मोठा आवाज केलेल्या खेड तालुक्यातील भांबुरवाडीच्या तरुणाचेच ते आहेत.