राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून राजकीय वातावरण बघायला मिळतंय. यादरम्यानच्या काळात आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे. राज्यभरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गट आणि शरद पवार गट वेगळे लढत असून याला फक्त पिंपरी चिंचवड महापालिका अपवाद आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढताना दिसत आहेत. हेच नाही तर या महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांवर फार काही टिकाही केली जात नाही. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी tv9 मराठीला एक मुलाखत दिली असून त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे यादरम्यान दिली आहेत. आमच्या युतीत सात ते आठ पक्ष असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
टीव्ही9 मराठीच्या अँकर निखिला म्हात्रे यांनी वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडाल का? हा प्रश्न अजित पवारांना विचारला असता. अजित पवारांनी म्हटले की, कशा करता वैचारिक दबाव वाढेल आणि काय होईल. आमचं आमचं बरं चाललंय. तुम्ही का दृष्ट लावता आम्हाला. महापाैरपदाबद्दल बोलताना अजित पवारांनी म्हटले की, याबाबत पुणे आणि पिंपरीचिंचवडकर कौल देतील.
आम्हाला दोन्ही ठिकाणी बहुमत देतील. आमचा विजय होईल. आमचा महापौर होईल. दोन्ही शहरं आमच्या हातात सूत्र देतील. आमचाच महापौर होणार आहे. कामच करून दाखवणार आहे. मी काम करून दाखवलंय ना. पिंपरीत काय केलं ते पाहा. बेस्ट सीटी म्हणून मनमोहन सिंग यांनी आम्हाला पुरस्कार दिला होता. 10 वर्ष पूर्ण पुणे माझ्यासोबत नव्हतं. काहींची मदत घ्यावी लागली. पण आम्ही काम करू.
युतीबद्दल बोलतान अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही बसून त्यावर चर्चा करू. कारण नसताना चुकीचा अर्थ काढू नका. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने कॉन्फिडन्स वाढला असं नाही. आम्ही त्या अँगलने विचारच केला नाही. विचारच केला नाही तर त्या अँगलने विचार का करायचा. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होती. एकमेकांविरोधात लढायचो. केडीएमसी आणि इतर निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जबडा वगैरे बोलायचे, असेही अजित पवारांनी म्हटले.









































