पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 69 मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू; मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

0
242

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात 69 मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण न करता सुरू आहेत. तसेच 216 मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू असल्याच्या मुद्द्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधले. दोन्ही शहरात किती मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही सुरू आहेत?, अशा संस्थांवर शासनाने काय कार्यवाही केली?, असे प्रश्न आमदार जगताप यांनी अधिवेशनात उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. परंतु, यातील अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू आहेत. आरटीओकडून घेतलेल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. तसेच आरटीओने देखील या मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी केलेली नाही. याप्रकरणी आमदार जगताप यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे, “पुणे कार्यालयाच्या अभिलेखावर मंजूर मोटार ड्रायव्हिंग स्कूलची एकूण संख्या 503 आहे. यांपैकी 287 मोटार ड्रायव्हिंग स्कूलना सारथी 4.0 प्रणालीवर लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. परंतु, 287 पैकी 218 मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना वैध आहे. उर्वरित 69 मोटार ड्रायव्हिंग स्कूलची मुदत संपलेली आहे. त्यांनी अद्याप नूतनीकरण केलेले नाही. नूतनीकरणासाठी या सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांचे लॉगीन बंद आहेत. उर्वरित 216 मोटार ड्रायव्हिंग स्कूल बऱ्याच कालावधीपासून बंद असून, त्यांना सारथी प्रणालीवर लॉगीन दिलेले नाहीत. त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) नवीन मोटार ड्रायव्हिंग स्कूल मंजूर करताना अथवा मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या नूतनीकरणास मंजुरी देताना संबंधित कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून मोटार स्कूलची प्रत्यक्ष पाहणी करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन परवाना मंजुरी अथवा त्याचे नूतनीकरण केले जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सर्व मोटार ड्रायव्हिंग ‌स्कूलची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येते.