पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा- अमोल कोल्हेंची मागणी

0
251

पुणे – गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारांच्या बैठकीत केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी, शिवसंस्कार सृष्टी अशा महत्वाच्या प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला असूनही केवळ मतदारसंघातील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे बैठकीला उपस्थित राहिले.

उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि इंद्रायणी मेडिसिटी हे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाच्या मंजुरीनंतरही प्रलंबित आहेत. हे दोन्ही प्रकल्प
मार्गी लावण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर पर्यटन तालुका घोषित केलेल्या जुन्नरचा पर्यटन विकास आराखडा राज्य सरकारने तयार करावा अशी मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत केली.

याखेरीज छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात शिवसंस्कार सृष्टी निर्माण करण्यासाठी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वेळ उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी करतानाच खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढु बु. ही दोन ऐतिहासिक स्थळं जोडणारे रस्त्यांचे १० मीटरने रुंदीकरण करुन ‘शिव-शंभु कॉरिडॉर’ निर्माण करावा असा प्रस्तावही सादर केला.

आजच्या बैठकीचा पुरेपूर उपयोग करुन घेत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवनेरी गडावर भगवा ध्वज लावावा यासाठी आपण मागील २ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत असे सांगून राज्य सरकारनेही यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. तसेच मागील सरकारच्या काळात शिरूर लोकसभा मतदारसंघातील मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामांसह विविध विकासकामांवरील स्थगिती उठवावी अशी मागणीही केली.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आजच्या बैठकीला उपस्थिती लावल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी अनेक अर्थ लावले असले तरी माझ्यासाठी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी हे सर्वोत्तम व्यासपीठ होते. त्यामुळे कोणतेही राजकीय अर्थ काढण्यापेक्षा मी मांडलेल्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.