पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

0
5

एकजण गंभीर जखमी

महाळुंगे, दि. २१ पीसीबी – पुणे-नाशिक महामार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. १९) रात्री दहा वाजताच्या सुमारास कुरुळी येथे घडला.

गौतम निवृत्ती कांबळे (वय २८, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुकेश मिलिंद गायकवाड (वय ३५, रा. दापोडी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गौतम यांचे नातेवाईक मनोज मच्छिन्द्र उरके (वय २३, रा. खेड, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज यांचे नातेवाईक गौतम कांबळे आणि त्यांचा मित्र मुकेश गायकवाड हे दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गाने चाकणच्या दिशेने जात होते. कुरुळी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गौतम यांचा मृत्यू झाला. तर मुकेश हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच जखमींना रुग्णालयात दाखल न करता पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.