पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार; अजित पवारांनी केली घोषणा…

0
2

पुणे , दि. ८ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे सोबतच बारामतीची तुलना चाकण सोबत करू नका असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?

तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे, आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जसे की रस्ता अंडरग्राउंड ड्रेनेज, अशा अनेक बाबी असतात, यामध्ये बँकांचे वर्ल्ड बँकचे पैसे आणता येतात, केंद्र सरकारचा निधी आणता येतो, या प्रकारे आपल्याला करावे लागेल. काहींना ते आवडेल काहींना आवडणार नाही. मात्र, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात. मी देखील काम करताना पाहिले आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या महापालिका आल्या, ठाणे महानगरपालिका एकटी होती, त्यानंतर मुंबई महानगरपालिका झाली. मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथे पूर्वीपेक्षा आता वेगाचा विकास झाला आहे, वसई विरार महानगरपालिका झाली, त्या ठिकाणी सहा सात महानगरपालिका झाल्या. तसं आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड त्यानंतर वाकवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी या सर्व भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल, फुरसुंगी, उरुळी देवाची, तो सर्व परिसर एक महानगरपालिका नदी ओलांडून इकडे आलो पिंपरी चिंचवड मधनं तर बाकीच्या भागांमध्ये एक महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि जो सर्व वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते, तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे. या सगळ्या भागातील लोकसंख्या किती आहे. चाकणचा प्लॅन देखील आलेला आहे. मी म्हटलं तुम्ही मंजुरी घ्या, मी एकनाथ शिंदे यांची मदत घेतो, असेही पुढे अजित पवार यांनी म्हटला आहे
पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार

चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे, मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका आणि चाकण भागात एक आणि हिंजवडी भागात एक महापालिका करावी लागणार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
पाहणी दौऱ्यावेळी पोलीस आयुक्तांना अजितदादांनी खडसावलं

मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतायेत. मग पिक टाईममध्ये काय अवस्था होत असेल, असं अजित पवार म्हणाले. तसेच अजित पावर पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे?, सगळी वाहतूक सुरु करा, असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवले.