पुणे जिल्ह्यातील कनेरसर गावाला दुसऱ्यांदा देशाच्या सरन्यायाधिश पदाचा मान

0
225

पुणे, दि. १२ (पीसीबी) – जिल्ह्यातील कनेरसर (ता. खेड) सारख्या अत्यंत छोट्या गावाच्या गळ्यात पुन्हा एकदा देशाचे सरन्यायधिशपदाची माळ पडणार आहे. माजी सरन्यायाधिश यशवंतराव चंद्रचूड यांच्यानंतर त्यांचेच चिरंजीव न्यायमुर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice Dhananjay Chandrachud) हे पुढील महिन्याच्या ९ तारखेला देशाचे सरन्यायाधिश म्हणून विराजमान होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश ललित (Uday Lalit) यांनी तशी नुकतीच घोषणा केली.

सरन्यायाधीश ललित ८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने सरकारने ७ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश ललित यांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्याची विनंती केली होती. ज्येष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे विद्यमान सरन्यायाधीश ललित यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ आहे. पर्यायाने त्यांच्याच नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ते देशाचे ५० वे सरन्यायाधिश म्हणून विराजमान होण्यासाठी केवळ औपचारीकता बाकी आहे.
दरम्यान, यापूर्वी सरन्यायाधिश म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल सलग सात वर्षे आणि ४ महिने एवढा कार्यकाल यशवंतराव चंद्रचूड (सन १९७८ ते सन १९८५) यांना मिळाला होता. कनेरसर, पुणे, मुंबई आणि दिल्ली असा शैक्षणिक प्रवास केलेल्या यशवंतराव यांचेसारखाच शैक्षणिक प्रवास विद्यमान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचा आहे. चंद्रचूड वाडा म्हणून अजुनही त्यांचा भव्य वाडा कनेरसर व निमगाव (ता.खेड) येथे उभा आहे. येथे काही प्रमाणात शेतीही त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जाते.

कनेरसर येथील यमाई देवी, निमगाव येथील खंडोबा या कुलदैवत-ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी चंद्रचूड परिवार कुठलाही गाजावाजा न करता येवून जात असल्याची माहिती स्थानिक मंडळी देतात. गावातील कुठल्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक वा तत्सम घडामोडींशी त्यांचा संपर्क फासरा नसतो. तरी गावातील अनेकांच्या ते संपर्कात असतात शिवाय अनेक कनेरसरकरांच्या वैयक्तिक मदतीला धावल्याची अनेक उदाहरणेही ग्रामस्थ त्यांच्याबद्दल आवर्जून सांगतात.

न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुडांची कौटुंबीक माहिती अन जिवनप्रवास –
त्यांचे वडील माजी सरन्यायाधिश यशवंतराव विष्णू चंद्रचूड. आई प्रभा चंद्रचूड या विद्वान शास्त्रीय गायिका. न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते एलएलबी झाले. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएम ही पदवी घेतली. हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन त्यांना गौरवले होते.