पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे सर्वसामान्यांकडून जन सन्मान यात्रेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात माझ्या बहिणींसोबत तसंच युवा खेळाडूंसोबत संवाद साधला.
नुकताच मी जो राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, त्यातून सर्व समाजघटकाला आम्ही काय दिलं, कोणकोणत्या अभिनव योजना देऊ केल्या, त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आम्ही ही जन सन्मान यात्रा काढली आहे. आधीचं सरकार असो, आताचं सरकार असो.. मी तेव्हाही अर्थमंत्री होतो आणि आताही अर्थमंत्री आहे. राज्याच्या विकासासाठी मी कधी निधी कमी पडू दिला नाही. २०१९ ते २०२४ या कालावधीत विकास कामांसाठी इंदापूर तालुक्याला ५ हजार ४९५ कोटी ३४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला.
माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आतापर्यंत सव्वा कोटी मायमाऊलींच्या बँक खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. याव्यतिरिक्त मुलींच्या उच्च शिक्षणाचा १०० टक्के खर्च सरकार उचलणार आहे. ५२ लाख कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे माझ्या शेतकरी बांधवांना वीजबिल माफ केलं आहे. बारावी आणि पदवीधर तरुणांना प्रशिक्षण भत्ता सुद्धा आम्ही देत आहोत. अशा अनेक योजना आम्ही राबवत असून त्या पुढेही चालू राहाव्यात यासाठी महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. जे करू ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी करू.