पुणे, दि. २७ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. यामुळे राज्य मंत्रिमंडळाचे विस्तार होऊन खातेबदलही झाले. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचे संपूर्णपणे विस्तार झालेले नाही. उर्वरित मंत्रिपदांवर दावा करण्यासाठी सरकारमधील तीनही पक्षांतील आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यातच आता जिल्ह्यांचे पालकमंत्रीही बदलले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यांच्याऐवजी आता ही जबाबदारी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. तर, चंद्रकांतदादांकडे पुन्हा त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. ते त्यासाठी आग्रही आहेत.
दुसरीकडे नुकतेच राज्य मंत्रिमंडळात सहभागी झालेले वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे देखील कोल्हापूरसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होतो? याकडे कोल्हापूरचेच नाही, तर पश्चिम महाराष्ट्राचेही लक्ष लागले आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्रीपद सोडल्यानंतर चंद्रकांतदादांना कोल्हापूरचे पद मिळण्याची दाट शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार दोन जुलै रोजी झाला. आता अखेरचा तिसरा विस्तार याच महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. त्यामागे आगामी महापालिका निवडणुकांचे गणित असणार आहे. या गोष्टी विचारात घेऊन सदर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. भंडारा गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून धर्मरावबाबा अत्राम, बीडला धनंजय मुंडे, तर नाशिकचे छगन भुजबळ यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे कळते.