पुणे, दि.11 (पीसीबी)
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर महायुतीमधील रंगलेले राजकीय नाराजीनाट्य शपथविधी सोहळ्यानंतर थांबले. मात्र, मंत्रिपदाचे वाटप आणि मंत्रालयावरून तिन्ही पक्षांमध्ये चर्चाचर्वण सुरू आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार आणि नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती ‘सीविक मिरर’ला मिळाली आहे. संभाव्य मंत्र्यांची एक यादीदेखील समाज माध्यमावर व्हायरल झाली असून यामध्ये दिग्गजांच्या नावाला कात्री लावण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात २०१९ मध्ये घडलेल्या सत्तानाट्यानंतर पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे आले होते.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले पवार पुण्यात दर शुक्रवारी किंवा शनिवारी आढावा बैठक घेत असत. विशेषत: कोविड कालावधीत ते नित्यनेमाने ही बैठक घेत असत. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना-भाजपचे सरकार आले. या सत्तांतरानंतर कोथरूडचे आमदार बनलेले चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री झाले. त्यानंतर अवघ्या एक वर्षातच अजित पवार हेदेखील राष्ट्रवादीमधून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या कृतीप्रमाणे पक्षावर दावा सांगितला. स्वाभाविकच विधीमंडळाचे गटनेतेपद असल्याने पक्ष त्यांच्याकडे गेला. अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीमध्ये सहभागी झाले. ते उपमुख्यमंत्री बनले. ही त्रिकोणी सत्ता सुरू झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चढाओढ सुरू झाली होती. अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद मिळावे, याकरिता आग्रही मागणी सुरू केली होती. त्यानंतर, त्यांच्या नाराजीच्या चर्चादेखील सुरू झाल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दोन दादांमध्ये रंगलेला पालकमंत्रिपदाचा हा डाव आता पुन्हा एकदा रंगला आहे. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालक उपमुख्यमंत्री अजित पवार होणार की चंद्रकांत पाटील होणार, याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
पुणे जिल्ह्याचे राजकारण सहकाराशी संबंधित असल्याने राष्ट्रवादी त्याकरिता नेहमीच आग्रही राहिलेली आहे. यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून मिळणारा निधी मिळवण्याची धडपड, जिल्ह्यावरची पकड आणि प्रशासकीय वचक याकरिता आवश्यक असलेले पालकमंत्रिपद अजित पवार यांनी पदरात पाडून घेतले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना पवार यांनी जिल्ह्याला झुकते माप देत अधिकाधिक निधी दिला होता. मात्र, सत्तांतर झाल्यावर पालकमंत्री बनलेल्या पाटील यांनी ‘डीपीसी’तील अनेक कामांना कात्री लावली होती.
आपापल्या पक्षांना फायदा होईल, अशाप्रकारे निधी घेण्यासाठी नेत्यांमध्येदेखील स्पर्धा होती. आता तीच स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. ऐतिहासिक बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या महायुतीमध्ये अद्याप मंत्रिपदाची रस्सीखेच सुरू आहे. गृह विभाग, नगर नियोजन विभागासह विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची ओढाताण सुरूच आहे. त्याकरिता देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सातत्याने बैठकादेखील सुरू आहेत. दरम्यान, समाजमाध्यमात संभाव्य मंत्रिमंडळाची एक यादी फिरू लागली आहे. यामध्ये बड्या दिग्गजांची नावे नसल्याचे दिसते आहे. पुण्यामधून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, महेश लांडगे आदी नेत्यांची नावे भाजपतून मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडूनही मंत्रिपदांसाठी चाचपणी सुरू आहे. या वाटाघाटीत अजित पवारांचे होम ग्राऊंड असलेल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्याकडे राखण्यात ते यशस्वी होतात की भाजपचे चंद्रकांत पाटील हे पद पुन्हा खेचून आणतात, हे येत्या १४ तारखेला समजणार आहे.
महायुतीच्या सत्ताकाळात पूर्वी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते, मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले. त्यांचा प्रशासनावर अधिक वरचष्मा असल्याचे दिसत होते. पुणे जिल्ह्यातील कसलेले राजकारणी असलेले अजित पवार हे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यावर पकड ठेवून होते. त्यामुळे पाटील आणि पवार यांच्यामध्ये अधिकारांवरून सुप्त संघर्ष सुरू झाला होता. याच राजकीय शीतयुद्धामधून पालकमंत्रिपदाची स्पर्धा सुरू झाली. त्यातच अनेकदा पुण्याचे पालकमंत्री बदलणार, अशा चर्चा झडू लागल्या होत्या. कालांतराने अनेक राजकीय घडामोडी पडद्याआड घडल्या. चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आणि पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार विराजमान झाले.